Maharashtra Weather News : संपूर्ण गणेशोत्सवादरम्यानच राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. कधी विदर्भ, कधी कोकण, तर कधी मराठवाड्यात बरसणाऱ्या या पावसानं मुंबईतही सूर्यकिरणांना प्रवेश दिला नाही. अशा या काळ्या ढगांच्या अच्छादनाच्याच वातावरणात राज्य गेले काही दिवस सातत्यानं बदलणाऱ्या हवामानाचा सामना करताना दिसत आहे. पुढील 24 तासांमध्ये या स्थितीत काहीश अंशी सुधारणा होणार असून ढगाळ वातावरणही अंशत: घटताना दिसणार आहे.
कसं असेल पुढील 24 तासांमधील हवामान?
हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात कोकणातील उत्तरेकडे असणाऱ्या काही भागांमध्ये पावसाच्या सरींचा जोर वाढणार आहे. तर, वाऱ्याचा वेग वाढून ताशी 30 ते 40 किमी वर पोहोचून उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्याच्या घाटमाथ्यावरील भागांमध्येसुद्धा पावसाची जोरदार हजेरी असेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
जोरदार वाऱ्यांसह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह राज्यात मराठवाडा भागातसुद्धा पावसाची जोरदार हजेरी असेल असा अंदाज वर्तवत हवामान विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे.
हवामान विभागानं पूर्व विदर्भालाही जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून, सध्याच्या घडीला गुजरातचा उत्तरेकडील भाग आणि राजस्थानच्या नैऋत्येकडील कमी दाबाच्या प्रणालीमुळं राज्याच्या पर्जन्यमानावर परिणाम होत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्या कारणानं आणि तिथं निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळं मराठवाडा आणि विदर्भासह कोकणावर पावसाची वक्रदृष्टी असल्याचं पाहायला मिळेल.
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
FAQ
पुढील 24 तासांमध्ये कसं असेल महाराष्ट्राचं हवामान?
हवामान विभागाच्या मुंबई शाखेच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात हवामानात काहीशी सुधारणा दिसेल, परंतु काही भागांमध्ये पाऊस आणि ढगाळ वातावरण कायम राहील
कोकणासाठी काय इशारा?
उत्तर कोकणातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमीपर्यंत पोहोचेल, ज्यामुळे पावसाच्या सरी अधिक तीव्र होऊ शकतात.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
नागरिकांनी जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाच्या शक्यतेमुळे सतर्क राहावे. विशेषत: मराठवाडा आणि घाटमाथ्यावरील भागात प्रवास करताना काळजी घ्यावी.