New GR issued for government employees:शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 24.03.2025 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण GR !

New GR issued for government employees: विभागीय चौकशी आज्ञावली (DE MODULE) वापरण्याबाबतच्या सूचना विभागीय चौकशीबाबतच्या प्रकरणांची सद्यस्थिती कळावी आणि विभागीय चौकशी च्या प्रकरणावर नियंत्रण ठेवणे शक्य व्हावे यासाठी NIC मार्फत विभागीय चौकशी आज्ञावली (DE MODULE) सुरु करण्यात आली आहे.

सदर आज्ञावली eHRMS या आज्ञावलीशी संलग्न करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी / कर्मचारी याच्याविरुध्द शिस्तभंग विषयक कारवाईची माहिती तात्काळ उपलब्ध होवून त्याची नोंद त्याच्या सेवापुस्तकात घेणे शक्य होईल.

त्यानुषंगाने, विभागीय चौकशी आज्ञावली – DE MODULE वापरण्याबाबतच्या सूचना खालीलप्रमाणे देण्यात येत आहेत :-

१) विभागांकडे सुरु असलेली सर्व शिस्तभंगविषयक प्रकरणे (निलंबन, अभियोग, विभागीय चौकशी, इ.) DE MODULE आज्ञावलीमध्ये नोंदविणे व अद्ययावत करणे अनिवार्य करण्यात येत आहे.

२) सद्यस्थितीत DE MODULE आज्ञावलीमध्ये प्रशासकीय विभागांकडून गट “अ” व गट “ब” मधील अधिकाऱ्यांची प्रकरणे नोंदविण्यात येत आहेत. आता मंत्रालयीन स्तरावरील गट “क” व गट “ड” मधील कर्मचारी यांची प्रकरणेदेखील DE MODULE आज्ञावलीमध्ये नोंदविण्यात यावीत.

३) क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांची प्रकरणेदेखील DE MODULE आज्ञावलीमध्ये नोंदविण्यात यावीत.

यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांचे नियंत्रणाखालील क्षेत्रिय स्तरावरील कार्यालयांची यादी, NIC NETWORK त्या कार्यालयात उपलब्ध आहे किंवा कसे या माहितीसह सामान्य प्रशासन विभागास पाठविण्यात यावी.

त्यानुसार संबधित कार्यालयांना DE MODULE आज्ञावली साठी आवश्यक असणारे Login ID उपलब्ध करुन देण्यात येतील.

४) प्रकरणे नोंदविताना अपचाऱ्याचे पूर्ण नाव (नाव, मधले नाव, आडनाव), पदनाम, गट, सेवार्थ आयडी, शासकीय ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक, कार्यालयीन तसेच निवासी पत्ता नोंदविणे अनिवार्य आहे.

५) तसेच साक्षीदारांचे देखील पुर्ण नाव (नाव, मधले नाव, आडनाव), पदनाम, गट, सेवार्थ आयडी, शासकीय ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक, कार्यालयीन तसेच निवासी पत्ता नोंदविणे आवश्यक आहे.

६) पदोन्नती, दोन्नती, अकार्यकारी वेतनश्रेणीचा लाभ, कालबध्द पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना, वयाच्या ५०-५५ व्या वर्षीचे पुनर्विलोकन, प्रतिनियुक्ती, सेवानिवृत्ती, पारपत्र / व्हिसा व इतर सेवाविषयक बाबींसाठी आवश्यक असणारे ना-विभागीय चौकशीचे प्रमाणपत्र (दक्षता प्रमाणपत्र / Vigilance Certificate) DE MODULE आज्ञावलीमधूनच प्राप्त करून घेणे अनिवार्य राहील.

७) ना – विभागीय चौकशी / विभागीय चौकशी / दक्षता प्रमाणपत्र (Vigilance Certificate) देण्यापूर्वी संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्याविरुध्दच्या शिस्तभंगषियक कार्यवाहीबाबतची माहिती DE MODULE आज्ञावलीमध्ये भरली आहे व ती अद्ययावत करण्यात आली आहे याबाबतची खात्री करून घ्यावी.

८) यापुढे विभागीय चौकशी करण्यासाठी, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांच्या नियुक्तीचे आदेश तसेच तपासणीसूची व त्यानुसार प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे DE MODULE मध्ये अपलोड आवश्यक राहील.

९) DE MODULE मध्ये प्रकरण नोंदविल्यानंतर सदर प्रकरणाचा आज्ञावलीमधून तयार होणारा क्रमांक (System Generated Number) (DEM ***) धारिकेच्या निर्देशपत्रावर / टिप्पणीच्या सुरुवातीस लिहून प्रकरण सादर करावे.

१०) शिस्तभंगषियक कार्यवाहीबाबतची प्रकरणे सामान्य प्रशासन विभागास सादर करताना DE MODULE मध्ये देण्यात आलेल्या नमुन्यांमध्येच (Templates) सादर करावीत.

उपरोक्त बाबींची पुर्तता केली नसल्यास संबंधित शिस्तभंगषियक कार्यवाहीबाबतचे प्रकरण सामान्य प्रशासन विभागाकडून स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra. gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०३२४१५२७०७६२०७ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,